मुंबई,पालघरमध्ये पावसाचा कहर; रेडअलर्ट कायम
मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने आजही मुंबईसाठी रेड अलर्ट कायम ठेवला असून, पालघर आणि वसई-विरार पट्ट्यातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेने परिस्थितीचा आढावा घेत संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवली आहे. शहरातील विविध भागांत 10 हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून, पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
नागरिकांना खबरदारीचे आवाहन
प्रशासनाने अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो.
वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धरणसाठ्यात किरकोळ वाढ
दुसरीकडे, पुणे शहर आणि जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असून, खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे.
सध्या खडकवासला धरणात 15 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुढील काही दिवसांत धरणसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात मान्सून अधिक सक्रिय
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यासह मध्य भारतात मान्सून अधिक सक्रिय राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि नाशिक परिसरात 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
उद्यासाठीही इशारा
उद्याही पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आणि नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.