FDA च्या नव्या पोर्टलला मोठा प्रतिसाद; पुण्यातून सर्वाधिक खाद्य तक्रारींची नोंद

FDA च्या तक्रार पोर्टलला मोठा प्रतिसाद मिळत असून, 24 तासांत 10 लाखांहून अधिक हिट्स नोंदवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात अन्नपदार्थांबाबत सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून आल्या असून, त्यामध्ये अस्वच्छ अन्न आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा समावेश आहे. FDA प्रमुख तुकाराम मुंढे यांनी खाद्य व्यवसायिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे.

हॉटेल-रेस्टॉरंटवर Image

पुणे : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तक्रार नोंदणी पोर्टलला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पोर्टल सुरू झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत 10 लाखांहून अधिक लोकांनी या पोर्टलला भेट दिल्याची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

राज्यात अन्नपदार्थांशी संबंधित दाखल होणाऱ्या तक्रारींमध्ये पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यातून आलेल्या बहुतांश तक्रारी या अस्वच्छ अन्न, खाद्यपदार्थांची खराब गुणवत्ता, स्वच्छतेचा अभाव आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन यासंदर्भातील असल्याचे FDA आयुक्तांनी सांगितले.

नागरिकांना अन्नपदार्थांबाबतच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता याव्यात आणि त्यावर तातडीने कारवाई करता यावी, यासाठी FDA ने ऑनलाइन तक्रार पोर्टल सुरू केले आहे. या प्रणालीमुळे तक्रारींची नोंद, तपासणी आणि कारवाईची प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.

नोंदवण्यात आलेल्या तक्रारींचा सुरक्षित रेकॉर्ड ठेवण्यासाठी तसेच यापूर्वी कारवाई झालेल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर खाद्य आस्थापनांची माहिती जतन करण्यासाठी FDA ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार करत आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर लक्ष ठेवणे अधिक सोपे होणार आहे.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर खाद्य व्यवसायिकांना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) निश्चित केलेल्या 22 प्रमुख नियमांचे पालन करणे प्रत्येक खाद्य व्यवसायासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तुकाराम मुंढे यांनी FDA प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभरातील खाद्य व्यवसायांवर तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांवर अचानक तपासणी करून स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जात आहे.

यापूर्वी मुंबईतील प्रसिद्ध पारशी डेअरी फार्ममध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे गंभीर उल्लंघन आढळल्यानंतर FDA ने कारवाई करत परवाना निलंबित केला होता. तसेच मुंबईतील केईएम रुग्णालयातील कॅन्टीनवरही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

FDA च्या या कडक कारवाईमुळे राज्यातील हॉटेल आणि खाद्य व्यवसायांमध्ये स्वच्छता व अन्न सुरक्षेचे नियम पाळण्यावर अधिक भर दिला जात आहे.

Inline Article Ad 728x90