पुण्यातील मोशी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात कचऱ्याचा ढिगारा कोसळला; ४० तासांनंतरही ८ कामगार बेपत्ता
पुण्यातील मोशी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळून ८ कामगार अडकले आहेत. ४० तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू असून NDRF, लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस पथके शोधमोहीम राबवत आहेत. आतापर्यंत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून काहींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

पुणे: पुण्यातील मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी (Waste-to-Energy) प्रकल्पात कचऱ्याचा मोठा ढिगारा अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेला ४० तासांहून अधिक काळ उलटला असून, अजूनही ८ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), भारतीय लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली असून, अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध घेतला जात आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर काही कामगारांना बचाव पथकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी बचाव पथकांकडून रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहेत.
मोशी येथील हा वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प २०२३ मध्ये सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पात घडलेल्या दुर्घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सुरक्षेच्या उपाययोजनांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित असून संपूर्ण बचाव मोहिमेवर लक्ष ठेवले जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.