जेलमधून बाहेर येताच संतोष पंडितांचा मोठा निर्णय; म्हणाले, ‘थांबणार होतो, पण आता…’
जामीनावर सुटका झाल्यानंतर पुण्यातील युट्युबर संतोष पंडित यांनी पुन्हा जनतेच्या समस्या मांडत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र यापुढे आपल्या भाषेत बदल करणार असल्याचे सांगत त्यांनी अपशब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफीही मागितली. त्याचबरोबर कोठडी आणि कारागृहातील अनुभवांबाबतही त्यांनी काही गंभीर दावे केले आहेत.
.jpg)
पुणे : जामीनावर सुटका झाल्यानंतर पुण्यातील युट्युबर संतोष पंडित पुन्हा चर्चेत आले आहेत. कारागृहात असताना सोशल मीडियावरील काम थांबवण्याचा विचार मनात आला होता, मात्र बाहेर आल्यानंतर नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून आता मागे हटणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी आपल्या बोलण्यातील भाषा बदलण्याची तयारी दर्शवत, अपशब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण मनापासून माफी मागत असल्याचेही पंडित यांनी सांगितले.
‘कारागृहात असताना सगळं सोडून द्यावं असं वाटलं’
संतोष पंडित यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, कोठडीत असताना पुढे हे काम थांबवण्याचा विचार त्यांनी केला होता. मात्र सुटकेनंतर लोकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून आपला निर्णय बदलल्याचे त्यांनी सांगितले.
“जनतेची साथ असेपर्यंत मी मागे हटणार नाही. माझ्याकडून काही अपशब्द वापरले गेले असतील किंवा कोणाचे मन दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागतो,” असे पंडित यांनी म्हटले.
आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून कोणताही राजकीय अजेंडा नसल्याचा दावाही त्यांनी केला. सामान्य नागरिकांच्या समस्या मांडणाऱ्या लोकांवर दबाव आणला जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
लॉकअपबाबत संतोष पंडितांनी काय सांगितलं?
कारागृहातील अनुभव सांगताना संतोष पंडित यांनी तुरुंगातील परिस्थितीबाबत काही दावे केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, येरवडा कारागृहाची क्षमता सुमारे दोन ते अडीच हजार कैद्यांची असताना तेथे सुमारे सात हजार आरोपी असल्याचे त्यांना समजले.
याशिवाय कोथरूड पोलीस ठाण्यात लॉकअपची सुविधा नसल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे पोलीस कोठडीच्या काळात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पंडित यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या दिवशी त्यांना येरवडा येथे, त्यानंतर खडकीतील लॉकअपमध्ये आणि पुढील दिवसांत पुन्हा येरवडा व खडकी येथे ठेवण्यात आले.
संतोष पंडित यांच्यावर गुन्हा का दाखल झाला होता?
संतोष पंडित सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेची विकासकामे, रस्ते आणि विविध नागरी समस्यांबाबत सातत्याने व्हिडीओ प्रसिद्ध करत असतात.
काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुनील पांडे यांच्या तक्रारीनंतर डेक्कन पोलिसांनी दोन संशयितांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. संबंधित व्हिडीओमधून मंत्र्यांची बदनामी करण्यात आली तसेच असभ्य भाषेचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
आता जामीनावर बाहेर आल्यानंतर संतोष पंडित यांनी नागरिकांच्या समस्या मांडण्याचे काम सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र यापुढे भाषा वापरताना बदल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.