पुण्यात राहुल गांधींचा ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम; बैठकीत नेत्यांना नेमका कोणता कानमंत्र? भाजपवर वडेट्टीवारांचा निशाणा

राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर असून ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमातून महाराष्ट्रातील तरुणांशी संवाद साधणार आहेत. त्याआधी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत पुण्यातील विद्यार्थ्यांच्या घटनेपासून राज्यातील राजकीय परिस्थितीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींनी नेत्यांना धमक्यांना न घाबरता लढत राहण्याचा संदेश दिल्याचे सांगितले. दरम्यान, ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Rahul_ Gandhi

पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर असून ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणाईशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.

राहुल गांधींचे पुण्यात आगमन झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची बैठक घेत महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला.

बैठकीत पुण्यातील विद्यार्थ्यांच्या घटनेची चर्चा

बैठकीच्या सुरुवातीलाच पुण्यात काल विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या घटनेची राहुल गांधी यांनी माहिती घेतल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस नेत्यांनी त्यांना या घटनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी, धमक्या आणि दबावाला न घाबरता संघर्ष सुरू ठेवण्याचा संदेश राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना दिल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

“तुम्हाला धमकावण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो; मात्र तुम्ही लढत राहा,” असा संदेश राहुल गांधी यांनी दिल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवरही जोरदार टीका केली. भाजप हे लोकांच्या मनातून गेलेले सरकार असून केवळ तांत्रिकदृष्ट्या सरकार उरले आहे, असा दावा त्यांनी केला.

‘राहुल गांधी कानमंत्र देत नाहीत, विचार देतात’

राहुल गांधींच्या बैठकीतील भूमिकेबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, राहुल गांधी कानमंत्र देत नाहीत, तर विचार देतात आणि आज त्यांनी आम्हाला तेच विचार दिले. राज्यातील काही सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसमधील मरगळ दूर झाल्याचा दावा

राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यात काँग्रेसचे अनेक नेते एकत्र आल्याचे सांगत अपक्ष खासदार आणि काँग्रेस समर्थक विशाल पाटील यांनी काँग्रेसमधील वातावरणाबाबत सकारात्मक दावा केला. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जात असला तरी, काँग्रेसने केलेले प्रयत्न आता जनतेपर्यंत पोहोचू लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील मरगळ दूर होत असल्याचे दिसत असल्याचे पाटील म्हणाले.

‘छात्रों की गुंज’वरून भाजप-काँग्रेस आमनेसामने

दरम्यान, राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. काँग्रेसकडून कार्यक्रमाचे जोरदार प्रमोशन केले जात असताना भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. विद्यार्थ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

त्यामुळे राहुल गांधींचा पुणे दौरा केवळ तरुणांशी संवादापुरता मर्यादित राहणार की या दौऱ्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Inline Article Ad 728x90