रवी जाधव यांचा 'फुलवारा' चित्रपट चर्चेत! छाया कदम यांनी केलं कौतुक; 'या' दिवशी होणार रिलीज
दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आगामी 'फुलवारा' या लावणीप्रधान मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर रिलीज झाला आहे. अभिनेत्री छाया कदम यांनी टीझर शेअर करत रवी जाधव आणि मेघना जाधव यांचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, कलाकारांचे चेहरे गुलदस्त्यात ठेवणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता असून, 'फुलवारा' 14 जानेवारी 2027 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आगामी 'फुलवारा' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 'नटरंग'सारख्या गाजलेल्या चित्रपटातून लावणीची ताकद मोठ्या पडद्यावर दाखवणारे रवी जाधव पुन्हा एकदा लावणीप्रधान चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच 'फुलवारा' या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर रिलीज झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
'फुलवारा'च्या टीझरमध्ये लावणीचा खास अंदाज
झी स्टुडिओज आणि रवी जाधव यांची निर्मिती असलेल्या 'फुलवारा'च्या टीझरमध्ये कलाकारांचे चेहरे दाखवण्यात आलेले नाहीत. मात्र, ढोलकीचा आवाज, घुंगरांचा नाद, लावणीची रंगत आणि अस्सल मराठमोळी वाद्यं यांची झलक पाहायला मिळते. नऊवारी साड्या, चिखल-पाण्यातून धावणारी पावलं आणि लावणीचा संघर्षमय प्रवास अशा दृश्यांमधून चित्रपटाची वेगळीच झलक समोर आली आहे. या चित्रपटात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार, याबाबत अद्याप गुपित कायम आहे.
छाया कदम यांनी केलं रवी जाधव यांचं कौतुक
अभिनेत्री छाया कदम यांनाही 'फुलवारा'च्या टीझरने भुरळ घातली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टीझर शेअर करत रवी जाधव आणि मेघना जाधव यांचं विशेष कौतुक केलं आहे.
छाया कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये रवी जाधव यांच्या चित्रपटांमधील गाणी, व्यक्तिरेखा, कथा आणि रंगसंगती यांचं कौतुक केलं. तसेच 'फुलवारा'च्या माध्यमातून पुन्हा एकदा इतिहास घडेल, असा विश्वासही व्यक्त केला. लावणीचा बाज, तिचा थाट आणि तिचा संघर्ष मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'फुलवारा' कधी होणार रिलीज?
'नटरंग'नंतर रवी जाधव पुन्हा एकदा लावणीच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट घेऊन येत असल्याने 'फुलवारा'कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटाचा टीझर पाहता लावणीचा पारंपरिक बाज आणि तिच्या संघर्षाची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट 14 जानेवारी 2027 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात मराठी प्रेक्षकांना लावणीचा अनोखा कलाविष्कार अनुभवता येणार आहे.