18 जिल्ह्यांची दुष्काळसदृश यादी जाहीर, पण बुलढाणा गायब! संतापलेल्या तुपकरांचा सरकारला थेट इशारा
राज्य सरकारने 18 जिल्ह्यांचा दुष्काळसदृश यादीत समावेश केला असला, तरी बुलढाणा जिल्ह्याला वगळण्यात आल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. “एसी केबिनमध्ये बसून दुष्काळ ठरवू नका, शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन परिस्थिती पाहा,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले. बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बुलढाणा : राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सोयाबीनसह विविध पिके करपली असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतीच 18 दुष्काळसदृश जिल्ह्यांची यादी जाहीर केली. मात्र या यादीत बुलढाणा जिल्ह्याचे नाव नसल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट सवाल उपस्थित केले आहेत. बुलढाण्यातील पिकांची अवस्था पाहता जिल्ह्याला दुष्काळसदृश यादीतून वगळण्याचा निर्णय कसा घेतला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“एसी केबिनमध्ये बसून दुष्काळाची यादी तयार करता?”
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 45 ते 50 दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडल्याचा दावा तुपकरांनी केला. त्यामुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांची मोठी हानी झाली असून अनेक ठिकाणी पिके करपल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“मंत्रालयातील एसी केबिनमध्ये बसून कागदावर दुष्काळाची परिस्थिती ठरवली जात आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन परिस्थिती पाहावी,” अशा शब्दांत तुपकरांनी सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधला.
अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असती तर केवळ 18 नव्हे, तर राज्यातील आणखी अनेक जिल्ह्यांचा दुष्काळसदृश यादीत समावेश झाला असता, असेही त्यांनी म्हटले.
दीड महिना पाऊस नाही; पिकांना सर्वाधिक गरज असतानाच दगा
बुलढाण्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. विशेषतः सोयाबीनला फुलोरा आणि दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात पुरेसा पाऊस मिळाला नाही.
12 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली असली, तरी पिकांना ज्या काळात पाण्याची सर्वाधिक गरज होती, त्या काळात पाऊस न झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता तुपकरांनी व्यक्त केली आहे.
हेक्टरी 1 लाखांची मदत द्या; तुपकरांची मोठी मागणी
रविकांत तुपकरांनी बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्ह्याचा दुष्काळसदृश यादीत तातडीने समावेश करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
“शेतकऱ्याने पिकासाठी पैसा खर्च केला, मेहनत घेतली. मात्र पाऊस नसल्यामुळे पीक हातातून गेलं. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
“लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलं आहे का?”
तुपकरांनी यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींनाही लक्ष्य केले. जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे एक खासदार आणि सहा आमदार असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते सरकारकडे आवाज का उठवत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
“लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलं आहे का? मतदारसंघातील राजकीय संघर्ष बाजूला ठेवा आणि मंत्रालयात जाऊन शेतकऱ्यांसाठी भांडा,” अशा शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींना सुनावले.
बँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र, मग शेतकऱ्यांसाठी का नाही?
बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा दाखला देत तुपकरांनी राजकीय नेत्यांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या निवडणुकीत विविध पक्षांचे नेते राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका पॅनलमध्ये एकत्र येऊ शकतात, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र का येऊ शकत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सरकार निर्णय बदलणार की आंदोलन पेटणार?
बुलढाण्यातील शेतकऱ्यांचे नुकसान, पावसाचा दीर्घ खंड आणि तुपकरांनी दिलेला आंदोलनाचा इशारा यामुळे आता सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. बुलढाण्याचा दुष्काळसदृश यादीत समावेश होणार का? हेक्टरी 1 लाखांच्या मदतीची मागणी सरकार मान्य करणार का? याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.