अजित पवारांच्या मृत्यूचं राजकारण नको! सुप्रिया सुळेंच्या टीकेला सुनेत्रा पवारांचं चोख प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राजकीय वर्तुळात चांगलीच जुंपली आहे. माझ्या भावाच्या अपघाताला इतके दिवस झाले तरी अद्याप एफआयआर (FIR) का दाखल झाला नाही, असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी पक्ष आणि अजित पवार गटाच्या आमदारांवर गंभीर नाराजी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना पक्षाध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, दादांच्या मृत्यूचे राजकारण कोणीही करू नये, असे ठणकावले आहे. तसेच, कुटुंबाला जेवढे दुःख झाले आहे तेवढे इतर कोणालाही होऊ शकत नाही, आमचा तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास असून त्यावर सातत्याने मीडिया ट्रायल करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत सुनेत्रा पवार यांनी मांडले.

Sunetra_Pawar

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीवरून सुरू असलेल्या चर्चेवर महत्त्वाची भूमिका मांडली आहे. अजित पवारांच्या मृत्यूच्या घटनेवरून वारंवार माध्यमांमध्ये चर्चा होणं आणि त्याचं राजकारण होणं योग्य नसल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, तपास यंत्रणांवर आपला पूर्ण विश्वास असून त्यांना तपासासाठी वेळ दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी आपल्या कुटुंबाच्या दुःखाची तीव्रता अधोरेखित केली.

‘दादांच्या जाण्याचं दुःख आम्हाला सर्वाधिक’

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “आदरणीय अजितदादा गेल्याचं आणि त्यांच्यामुळं निर्माण झालेली पोकळी माझ्या आणि माझ्या मुलांपेक्षा जास्त कोणाला माहिती असणार? आकाश कोसळलं आहे, ही भावना आम्ही अनुभवत आहोत.”

अजित पवारांच्या मृत्यूच्या घटनेबाबत सर्वांना काहीतरी स्पष्ट निर्णय आणि सत्य समोर यावं, अशी आमचीही इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न करत असल्याचंही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान, गृहमंत्र्यांची भेट; मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीसंदर्भात आपण पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट घेतल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात यासंदर्भात शब्द दिला असून तो पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

“आम्ही आदरणीय पंतप्रधान साहेबांना आणि आदरणीय गृहमंत्र्यांना भेटून आलो आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात शब्द दिलेला आहे. तो शब्द पाळण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत आहेत. तपास यंत्रणाही आपलं काम करत आहेत,” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

‘माझा तपास यंत्रणांवर विश्वास’

अजित पवारांच्या अपघाताची चौकशी लवकरात लवकर व्हावी, अशी आमचीही इच्छा आहे. मात्र, प्रत्येक अपडेट माध्यमांसमोर येणं आवश्यक नाही, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी घेतली.

“माझा तपास यंत्रणांवर आणि कायदा व संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्थेवर विश्वास आहे. मला वाटतं की आपण तपास यंत्रणांना वेळ दिला पाहिजे. सतत मीडियामध्ये येणं म्हणजे तपासाचा अपडेट मिळणं असं नाही,” असं त्या म्हणाल्या.

‘वारंवार चर्चा म्हणजे मीडिया ट्रायल होण्याची शक्यता’

अजित पवारांच्या मृत्यूच्या घटनेवर वारंवार माध्यमांमध्ये चर्चा केल्याने मीडिया ट्रायलसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी चिंता देखील सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

“वारंवार अशा गोष्टी करून मीडिया ट्रायल होते की काय, असं वाटतं. खरंतर आपल्या सर्वांनी याचा विचार केला पाहिजे. दादांची आई, दादांची मुलं आणि मी यांच्यापेक्षा त्यांचं दुःख कोणाला जास्त असणार? त्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टींची लवकरात लवकर चौकशी व्हावी, असं आम्हालाही वाटतं. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत,” असं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे आम्हाला अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीबाबत काहीच वाटत नाही किंवा आम्ही शांत आहोत, असा अर्थ काढण्याचं कारण नसल्याचंही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं.

‘दादांच्या जाण्याचं राजकारण कोणीच करू नये’

अजित पवारांच्या निधनाच्या घटनेचा राजकीय मुद्दा बनवू नये, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं.

“दादांच्या जाण्याचं अशा प्रकारचं राजकारण कोणीच करू नये, असं मला वाटतं,” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सुनेत्रा पवार यांनी थेट राजकीय प्रत्युत्तर न देता तपास यंत्रणांवरील विश्वास आणि कुटुंबाच्या भूमिकेवर भर दिल्याचं पाहायला मिळालं.

सुप्रिया सुळेंचा नेमका सवाल काय?

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला सवाल केला होता.

अमित ठाकरे यांनी फोटो हटवल्याच्या प्रकरणावर एफआयआर दाखल करण्यात आला, मग अजित पवारांच्या अपघाताच्या प्रकरणात आजपर्यंत एफआयआर झाला आहे का, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

“अमित ठाकरेंनी फोटो हटवल्यानं तुम्ही एफआयआर केला. माझा भाऊ गमावला. सरकारमध्ये माझा भाऊ उपमुख्यमंत्री होते. त्यांचा एवढा मोठा अपघात झाला, त्यांचा मृत्यू झाला. त्याचा आजपर्यंत एफआयआर झाला का?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला होता.

‘माझ्या भावाला न्याय कधी मिळणार?’

अजित पवार हे त्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचे 40 आमदार आजही सरकारमध्ये आहेत, याकडेही सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधलं.

“अजित पवार त्यांच्याच सरकारमध्ये होते, त्यांचं सरकार आहे. अजित पवार यांचे 40 आमदार आजही त्यांच्याच सरकारमध्ये आहेत. मी माझ्या भावासाठी न्याय मागत आहे. अमित ठाकरेंवर केस होत असेल, तर माझ्या भावाला न्याय कधी मिळणार?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला होता.

या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. आता सुनेत्रा पवार यांनी तपास यंत्रणांवर विश्वास व्यक्त करत माध्यमांमध्ये वारंवार चर्चा करण्यापेक्षा तपासाला वेळ देण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवरून पुढे नेमकी कोणती माहिती समोर येते आणि या मुद्द्यावर राजकीय वातावरण आणखी तापणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Inline Article Ad 728x90