संभाजीनगरातील प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह' FDAने सील केले

छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध 'मे. उत्तम उपहार गृह'वर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई केली आहे. तपासणीत वारंवार वापरलेले खाद्यतेल, झुरळांचा वावर, अस्वच्छ परिसर, कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रांचा अभाव आणि अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित करून आस्थापना सील करण्यात आली. तसेच वापरलेले तेल आणि वनस्पती तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे FDA ने स्पष्ट केले आहे.

संभाजीनगर FDA

छत्रपती संभाजीनगर : राज्यभर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाची धडक कारवाई सुरू असतानाच आता छत्रपती संभाजीनगरातील शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध 'मे. उत्तम उपहार गृह'वर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तपासणीत गंभीर अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने FDA ने संबंधित आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करत हॉटेल सील केले आहे.

FDA अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. समोसे आणि भजी तळण्यासाठी वापरलेले तेल वारंवार वापरले जात असल्याचे आढळले. तपासणीदरम्यान तेलाचे TPC (BR) रीडिंग 58 इतके नोंदवण्यात आले, जे सुरक्षित मर्यादेपेक्षा खूपच जास्त असल्याचे सांगण्यात आले. तसेच इमरती आणि जलेबी तयार करण्यासाठी वापरले जाणारे वनस्पती तूप (डालडा) पुन्हा वापरले जात असल्याचेही निदर्शनास आले. त्याचे BR रीडिंग 36 नोंदवण्यात आले.

तपासणीदरम्यान स्वयंपाकघर आणि अन्न तयार करण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झुरळांचा वावर आढळला. पेस्ट कंट्रोल केल्याची कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती. मिठाई तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कृत्रिम रंग 'टार्ट्राझीन' वापरला जात होता, मात्र तो किती प्रमाणात आणि कसा वापरायचा याबाबत कामगारांना कोणतीही माहिती नव्हती.

याशिवाय, भिंतींवर तेलाचा थर आणि जळमटं साचलेली होती. 25 ते 30 कामगारांकडे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र नव्हते. इडलीसाठी तयार केलेले आंबवलेले पीठ ड्रेनेज लाईनजवळ उघड्यावर ठेवण्यात आले होते. समोसे-भजी तळण्याच्या ठिकाणी तंबाखू आणि चुन्याची पाकिटे तसेच भिंतींवर थुंकल्याच्या खुणाही आढळल्या. कचरापेटी उघडी होती, खिडक्यांना जाळ्या नव्हत्या आणि संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे गंभीर चित्र दिसून आले.

तपासणीत आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. संबंधित आस्थापनाकडे रेस्टॉरंटचा परवाना असताना प्रत्यक्षात ते मिठाईचे उत्पादन करत होते. यासाठी स्वतंत्र उत्पादक परवाना आवश्यक असतानाही तो घेतलेला नव्हता.

या सर्व गंभीर अनियमितता लक्षात घेऊन FDA ने हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित केला असून आस्थापना बंद करण्यात आली आहे. तसेच वापरलेले खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचे नमुने पुढील रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. राज्यात सुरू असलेल्या अन्नसुरक्षा मोहिमेअंतर्गत अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Inline Article Ad 728x90