तटकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् शिवसेनेत खदखद; गोगावलेंना दळवींचा थेट सवाल, ‘ते तुमच्या घरी आले असते का?’

रायगडच्या राजकारणात एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील दुरावा कमी होत असल्याची चर्चा सुरू असतानाच एका भेटीने शिवसेनेत नाराजीचा सूर उमटला आहे. गोगावले यांनी तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत थेट सवाल उपस्थित केला.

Gogavale_Tatkare_Dalvi

रायगड : रायगडच्या राजकारणात गेल्या काही काळापासून एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दोन प्रमुख नेते अचानक एकाच ठिकाणी दिसले आणि जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मात्र, गोगावलेंच्या या भेटीनंतर आता त्यांच्याच पक्षातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी गोगावलेंच्या या भूमिकेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. बाप्पाचे दर्शन घेण्यात काहीही गैर नसले तरी रायगडमधील शिवसेना आणि तटकरे कुटुंबातील गेल्या अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष पाहता गोगावलेंनी ही भेट टाळायला हवी होती, अशी भूमिका दळवींनी मांडली.

‘सुनील तटकरे गोगावलेंच्या घरी आले असते का?’

महेंद्र दळवींनी यावेळी थेट सवाल उपस्थित केला. “सुनील तटकरे हे भरत गोगावले यांच्या निवासस्थानी आले असते का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी गोगावलेंना सूचक टोला लगावला.

भरत गोगावले हे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आहेत. मात्र कार्यकर्त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यामागचा प्रवास लक्षात घेता त्यांनी तटकरेंच्या घरी जाणं टाळायला हवं होतं, असं दळवी म्हणाले.

पालकमंत्रीपदाच्या संघर्षाचीही आठवण

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय तणाव अनेकदा समोर आला आहे. दळवी यांच्या म्हणण्यानुसार, भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी तटकरे कुटुंबाकडून प्रयत्न झाले होते. अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली.

या पार्श्वभूमीवर गोगावले यांनी तटकरे यांच्या घरी जाणं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलाच्या दृष्टीने योग्य नव्हतं, अशी दळवींची भूमिका आहे.

‘रायगडमध्ये संघर्ष कायम राहणार’

रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुढेही कायम राहील, असंही दळवी यांनी म्हटलं. त्यांनी तटकरे कुटुंबाच्या पूर्वीच्या राजकीय भूमिकांवरही प्रश्न उपस्थित केले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आग्रहाचं निमंत्रण मिळाल्यामुळे गोगावले तटकरे यांच्या घरी गेले असण्याची शक्यता दळवींनी मान्य केली. मात्र अशा भेटींचा राजकीय संदेश कार्यकर्त्यांपर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचू शकतो, त्यामुळे गोगावलेंनी अशा गोष्टी टाळाव्यात, असं त्यांचं म्हणणं आहे.

युतीधर्मावरही दळवींचा सवाल

महेंद्र दळवींनी विधानपरिषद निवडणुकीचा संदर्भ देत अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीचाही उल्लेख केला. शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असतानाही घडलेल्या राजकीय घडामोडींवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेतील सहकारी असले तरी रायगडच्या स्थानिक राजकारणात दोन्ही पक्षांमधील मतभेद अनेकदा समोर आले आहेत. त्यामुळे भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांची गणेशोत्सवातील ही भेट केवळ सदिच्छा भेट ठरणार की रायगडमधील नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Inline Article Ad 728x90